मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
कोरोनाच्या संकटकाळात, अस्मानि-सुल्तानी संकटाला पेलत, महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था मजबुतपणे सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधउपचार घेत असुन अगदी ठणठणीत आहेत.लवकरच जनसेवेत हजर होतील, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
अजित पवार सध्या आराम करत असून ते लवकरात लवकर बरे होऊन जनता दरबार घेणार असल्याचंही मिटकरी यांनी सांंगितलं आहे. अजित पवारांनीही ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली होती.
दरम्यान, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे, असं अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.







