अँड. जमील देशपांडे यांचे विभाग नियंत्रकांना निवेदन
जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रतीक्षा यादीवरील चालकांना पूर्ण प्रशिक्षण दिल्याशिवाय एसटी चालवू देऊ नका अशा मागणीचे निवेदन आज मनसे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष अँड.जमील देशपांडे यांनी सांगितले की , एस टी महामंडळ प्रतीक्षा यादीवरील ५० वाहन चालक यांना रविवारपासून नियुक्ती पत्र देऊन एस टी त्यांच्या हातात देणार असल्याचे बातम्यांमधून कळाले. प्रतीक्षा यादीवरील चालक यांची निवड ६ महिन्यापूर्वी झाली, त्यांचे प्रशिक्षण सुद्धा ६ महिन्यापूर्वी झाले. एसटीच्या नियमानुसार नियमित वाहन चालकसुध्दा १० ते १५ दिवस सुटीवर असल्यास त्यांना पुन्हा ३ दिवसांचे प्रशिक्षण देऊन मग कामावर हजर केले जाते. अशा परिस्थितीत ६ महिन्यापूर्वी प्रशिक्षण झालेल्या उमेदवारांना पुन्हा १० दिवसाचे प्रशिक्षण देण्यात यावे मगच त्यांना एस टी चालवू द्यावी,असे निवेदन आम्ही विभाग नियंत्रकांना दिले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शाररीक व मानसिक स्थिती योग्य असल्याचे प्रमाणपत्र आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र या उमेदवारांना दाखल करण्यास सांगावे एस टी कर्मचाऱ्यांचा संप मोडण्यासाठी प्रतिक्षा यादीवरील वाहन चालक यांची तातडीची नियुक्ती गंभीर दुर्घटनेला कारण ठरू नये अशी भीती मनसे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांनी या निवेदनात व्यक्त केलीय.