जामनेर तालुक्यात खादगाव येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खादगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे डोहरी तांडा येथील इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
उदय हरी तवर (वय ४७) असे मयत इसमाचे नाव आहे. रविवारी दि. १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता कामावरून आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. उदय तवर हे जामनेरहून डोहरी तांडा गावाकडे जात असताना खादगाव रस्त्यावर, जामनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यावर पडले आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रताप मथुरे हे करीत आहेत.