जळगाव तालुक्यात नशिराबाद महामार्गावर भीषण अपघात
जळगाव-नशिराबाद रोडवरील लक्ष्मीनारायण हॉलजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अंदाजे ३५ वर्षीय असलेल्या या तरुणाला धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक वाहन घेऊन फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघातग्रस्त तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाचे वर्णन आणि माहितीसाठी नातेवाईकांनी नशिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पवार हे करत आहेत.