अमळनेर येथील घटना, गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : कंपनीत रक्कमेची गुंतवणूक करुन अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवित भामट्यांनी अमळनेर येथील एका सेवानिवृत्त एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्याला ५ लाख ६० हजार ६८३ रुपयांचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्याने तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी दि. १७ सप्टेंबर रोजी दोन संशयितांवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकाश जानकीराम बडगुजर (वय ७९, रा. अमळनेर) हे ज्येष्ठ नागरिक एस.टी.महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. दि. १ मे ते ७ ऑगस्ट २०२५ पावेतो त्यांच्या व्हाट्सॲप मोबाइल क्रमांकावर अनोळखी रिधव वर्मा तसेच आकाश सिंग यांनी संपर्क साधला. क्वॉन्टा पल्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे आमिष या दोघांनी दाखवित त्यांच्याशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली.(केसीएन)आम्ही आपल्या पैश्यांची काळजी घेतो. या पैश्यांचा जास्त मोबदला मिळेल, असे सांगत या सायबर भामट्याने निवृत्त कर्मचाऱ्यावर जाळे फेकले. तक्रारदार यांनी सुरुवातीला काही रक्कमेची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर नफा होऊन एकुण १८ लाख ८५ हजार ३१६ रुपये कंपनीच्या ॲपमध्ये जमा झाल्याचे ऑनलाईन मोबाईलमध्ये दाखवित तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला.
निवृत्त कर्मचाऱ्याकडून संशयितांनी वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात ऑनलाईन एकूण ५ लाख ६० हजार ६८३ रुपये स्विकारले. त्यानंतर या संशयितांनी निवृत्त कर्मचाऱ्याकडे पाठ फिरविली. तक्रारदार यांनी या दोघांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अथवा मुळ रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदार यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे तपास करीत आहेत.