अमळनेर शहरातील कोंबडी बाजार भागातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : – अतिक्रमित टपरी राहू देण्याच्या कारणावरून दोघा भावांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजता कोंबडी बाजार भागात घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.
अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल हे कोंबडी बाजार भागात रस्त्याचे काम सुरू असल्याने हजर होते. त्यावेळी तेथे जितेंद्र साळुंखे व दशरथ साळुंके (रा. गुरुकृपा कॉलनी) हे दोघे भाऊ आले. आपली टपरी अतिक्रमित आहे. रस्त्याच्या कामामुळे ती काढली जाईल. तरी ती काढू नका, असे अग्रवाल यांना साळुंके बंधूंनी सांगितले. त्यावेळी अग्रवाल यांनी, ही बाब मुख्याधिकाऱ्यांना सांगा, असे सांगितले. त्याचा राग येऊन दोघा भावानी अग्रवाल यांना मारहाण केली. इतर कर्मचाऱ्यांनी अग्रवाल यांना दवाखान्यात दाखल केले.