अमळनेर तालुक्यात झाला होता अपघात
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाडसे गावाजवळ दुचाकी व आयशरचा अपघात झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दि. २८ रोजी घडली होती. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास कुवरसिंग आर्य (रा. बडवाणी मध्यप्रदेश, ह.मु. बहादरपुर ता. पारोळा) हा त्याच्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकलने (क्रमांक एमपी ४६ झेडसी ४६०२) नरडाणा येथे दि. २८ रोजी जात होता. पाडसे गावाजवळ समोरून येणारी पांढरी आयशरने (क्र. एमएच ११ एएल २४५९) धडक दिल्याने कैलास हा रस्त्याच्या कडेला फेकला जावून गंभीर जखमी झाला. त्याला आधी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात त्यानंतर धुळे येथे सरकारी दवाखान्यात दाखल केले.
डोक्याला गंभीर मार लागला असल्याने तो काहीच हालचाल करत नसल्याने त्यास धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा भाऊ सुरेश आर्य याच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात आयशर चालक राजेंद्र बारकू जाधव (रा. दरेकरवाडी ता. आंबेगाव जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.