जळगावात शिरसोली रस्त्यावर भीषण अपघात
जळगाव प्रतिनिधी : शहरातील शिरसोली रस्त्यावरील गुंजन मंगल कार्यालयाजवळ सोमवारी २ फेब्रुवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव एस्कॉर्ट वाहन आणि रिक्षा यांच्यात झालेल्या या धडकेत एकाच कुटुंबातील महिला आणि चिमुकल्यांसह एकूण ८ जण जखमी झाले आहेत.


भाजप खासदार मनोज तिवारी यांना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सोडून जळगावच्या दिशेने परतणारे एस्कॉर्ट वाहन आणि समोरून येणारी रिक्षा (क्र. एमएच १९, व्ही ८४०५) यांच्यात हा अपघात झाला.
रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात असताना रिक्षा आणि एस्कॉर्ट वाहनाची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा मोठ्या प्रमाणावर चक्काचूर झाला आहे. या अपघातात हरि विठ्ठल नगर भागातील रहिवासी असलेले जखमी झाले आहेत.
जखमी नागरिक
एकनाथ रामदास बारी (५०) – रिक्षा चालक, ज्योती एकनाथ बारी (४५) : गंभीर जखमी, रत्ना शंकर मिस्त्री (५०), किर्ती शिवाजी बारी (४०), अश्विनी शुभम कुमावत (२५), प्रियांशी शुभम कुमावत (३), सुशीला दिलीप बारी (५५), कुणाल शिवाजी बारी (१३).
पोलीस प्रशासनाची धाव
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड आणि सपोनी गणेश वाघ यांनी तातडीने रुग्णालय गाठले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. सर्व जखमींवर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरसोली रस्त्यावरील खराब स्थिती आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, या अपघातामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.










