जळगाव एसीबीची प्रभात कॉलनी येथे कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचा बहाणा करत वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणमधील एका कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७, रा. जळगाव) (कंत्राटी वायरमन, नेमणूक: प्रभात कॉलनी कक्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जळगाव येथील ४६ वर्षीय तक्रारदारांच्या घराचे वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावावर होते. महावितरणकडून वीज मीटर बदलण्याचे काम सुरू असताना तीन दिवसांपूर्वी वायरमन भूषण चौधरी तक्रारदारांच्या घरी आले होते.(केसीएन)त्यावेळी चौधरीने तक्रारदारांना सांगितले की, त्यांच्या वीज मीटरचे सील तुटले असून, त्यांनी त्यात छेडछाड केल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक दंड होऊन वीज चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वीज मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी भूषण चौधरीने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती.
दि. १० जून २०२५ रोजी यासंदर्भात एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली. तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपीने पंचासमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितली आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.(केसीएन)त्यानुसार, एसीबीने सापळा कारवाईचे आयोजन केले. आज दि. १० जून २०२५ रोजी भूषण चौधरी याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली, त्यावेळी एसीबीने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरणमधील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. हि कारवाई पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, तपास अधिकारी निरीक्षक स्मिता नवघरे, पथक सफौ सुरेश पाटील (चालक), पोहेकॉ सुनील वानखेडे, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.