जळगाव एसीबीचा पाचोरा कृषी कार्यालयात धडाका
जळगाव प्रतिनिधी – शेती साहित्यावरील सबसिडीचे अनुदान मिळवून देण्यासाठी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या पाचोरा येथील उप कृषी अधिकाऱ्यासह दोन खाजगी इसमांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज सोमवारी दिनांक २ फेब्रुवारी रोजी यशस्वी सापळा कारवाई केली. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


या प्रकरणात लिलाधर शिवाजीराव देशमुख (उप कृषी अधिकारी, वर्ग-३, पाचोरा कृषी कार्यालय), संजय प्रभाकर पाटील (व्यवसाय-व्यापार) आणि नितीन इंदलसिंग निकम (व्यवसाय-मजुरी) अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आंबेवडगाव ता. पाचोरा येथील एका शेतकऱ्याने शासन योजनेअंतर्गत नांगर आणि रोटर खरेदी केले होते. या साहित्याची सबसिडी मिळवण्यासाठी त्यांनी पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला होता. साहित्याचे फोटो काढून ते योजनेच्या वेबसाईटवर अपलोड करून अनुदान मंजूर करून देण्यासाठी उप कृषी अधिकारी लिलाधर देशमुख यांनी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ५ हजार रुपये देण्याचे ठरले.
एसीबीचा सापळा
देशमुख यांनी लाचेची ही रक्कम आंबेवडगाव येथील धनदाई कृषी केंद्राचे मालक संजय पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले होते. तक्रारदाराने याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. आज दि. २ फेब्रुवारी रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, लाचेची मागणी सिद्ध झाली. संजय पाटील दुकानावर नसल्याने, त्यांच्या सांगण्यावरून दुकानातील मदतनीस नितीन निकम याने ही ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली.
कारवाई पथक
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, सुरेश पाटील यांनी केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कुणी लाचेची मागणी करत असेल तर टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ७५८८६६१०६४ वर संपर्क साधावा.









