गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावचा उपक्रम
जळगांव (प्रतिनिधी) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव आणि रोटरी क्लब जळगाव आणि सोसायटी ऑफ अॅनेस्थेशिऑलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन प्रसंगी जीवन वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक उपचार पद्धतींची जाणीव आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याच्या उद्देशाने जीवन संजीवनी सीपीआर प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब अध्यक्ष रो.गिरीश कुलकर्णी, सचिव रो.. सुभाष अमळनेरकर,कार्यकारी सचिव रो. पंकज व्यवहारे, देवगिरी प्रांत मेडिकल विभाग प्रमुख व एमडी आसीयु स्पेशॅलिस्ट डॉ. लीना पाटील, जनरल फिजिशियन डॉ. सुनील सुर्यवंशी, डॉ. जयश्री राणे आणि श्री. सुबोध सराफ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांची उपस्थीती होती. विद्यार्थ्यांना संबोधित करताना रोटरी क्लब अध्यक्ष रो. गिरीश कुलकर्णी यांनी, आपत्कालीन प्रसंगी योग्य वेळी दिलेली पहिली मदत जीवनदान ठरू शकते. प्रत्येक तरुणाने प्राथमिक उपचार आणि सीपीआरचे मूलभूत कौशल्य आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. त्यांनी ‘गोल्डन मिनिट्स’चे महत्व अधोरेखित केले. डॉ. लीना पाटील यांनी सीपीआरचे वैज्ञानिक आधार, हृदयक्रिया बंद पडल्यास घ्यावयाची जलद पावले, छाती दाबण्याची योग्य पद्धत, ‘रेस्क्यू ब्रीद्स’ व श्वासमार्ग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती दिली. शांत मनाने, वैज्ञानिक पद्धतीने केलेली त्वरित कृती प्राणवाचक ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रात्यक्षिक सत्रात विद्यार्थ्यांनी सीपीआर पल्स तपासणी, प्रतिसाद तपासणी, श्वासमार्ग खुले करणे अशा महत्त्वपूर्ण तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.
या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. ललिता पाटील होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एआय आणि डीएस विभाग प्रमुख डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. खुशाली बेलदार तर समारोपात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले व उपस्थित विद्यार्थ्यांना या कौशल्याचा उपयोग समाजहित आणि आपत्कालीन प्रसंगी निःस्वार्थपणे करण्याचे आवाहन केले. भविष्यातही अशा जीवनोपयोगी व विद्यार्थी-केंद्रित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.या उपक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम् कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक व्यक्त केले.









