नाशिक ( प्रतिनिधी ) – नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 240 कोटींचे घबाड सापडले आहे. 6 कोटीं रोकड, 5 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले. 32 ठिकाणी जमीन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार, कंत्राटादारांशी संबंधित बिल्डर्स यांच्या निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले. या कारवाईने उत्तर महाराष्ट्र पुरता हादरून गेला असून, इतकी अफाट माया या महाभागांनी आतापर्यंत रिचवली कशी, त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष कसे गेले नाही, अशी चर्चाही सुरू झालीय.
22 डिसेंबररोजी पहाटे सुरू झालेली ही कारवाई पाच दिवस चालल्याचे समजते. मात्र, याची कुणकुणही कोणाला लागू देण्यात आली नाही. या कारवाईत 240 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. एकाचवेळी नंदुबारसह इतर ठिकाणच्या बिल्डरची कार्यालये, घरे, भागीदारांचे निवासस्थान, नातेवाईक यांच्या घरी हे छापे टाकण्यात आले. नाशिकमध्ये अतिशय उच्चभ्रू कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत आयकर विभागाने छापे टाकले. व्यावसायिकांची घरे आणि त्यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली. देवळाली कॅम्प आणि भगूर येथील कार्यालयातही कित्येकांचे घबाड सापडल्याचे समजते. व्यावसायिकांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली मध्यवस्तीत कारवाई होऊनही याचा थांगपत्ता कुणाला लागू देण्यात आला नाही.
ही कारवाई करण्यासाठी 175 अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले. 22 गाड्यांचा ताफा आणि तगडा पोलीस बंदोबस्त होता. नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण येथील अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. काही गुजरातमधून धुळेमार्गे तर काही जण नवापूरहून नंदुरबारमध्ये पोहचले.नाशिक, धुळ्यात अशा वेगवेगळ्या मार्गाहून हा ताफा पोहचला. अनेक व्यावसायिकांनी तब्बल 25 कोटींचे व्यवहार रोखीत केल्याचे समोर आले. या मायेची मोजदाद करायला पथकाला 12 तास लागले. यावेळी पाच कोटींचे दागिने सापडले. त्यात मौल्यवान हिरे, सोन्याची बिस्कीटे, मोत्याची दागिने, जडजवाहिरे सापडली. अनेकांनी बऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच्या नावावर व्यवहार केल्याचे आढळले. कित्येकांचा नातेवाईकांच्या घरी पैसा होता.उत्तर महाराष्ट्रातील बिल्डर आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.