जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील विदगाव परिसरातील शेतात एका तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. जगदीश रूबजी बारेला (वय-३१) रा. विरवाडे ता. चोपडा असे मयत तरुणाचे नाव आहे.
सविस्तर माहिती असी जगदीश बारेला हा आई, भाऊ आणि मुलगीसह विरवाडे येथे वास्तव्याला आहे. मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. जगदीश बारेला याला दारूचे व्यसन जडले होते. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दारूच्या नशेत असतांना घराच्या ओट्यावरून खाली पडला. त्यात त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या दुखापतीमुळे त्याचा प्रचंड त्रास होत होता. दरम्यान, मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जगदीश बारेला याचा भाऊ जगन बारेला याने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाले. ममुराबाद रोडने रिक्षाने जात असतांना विदगाव जवळ जगदीशने रिक्षातून उडी घेवून बाजूच्या शेतातून पळ काढत पसार झाला. जगदीशच्या भावाने त्याचा शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आला नाही. बुधवार १६ फेब्रुवारी रोजी विदगाव शिवारातील बालाजी पेट्रोल पंपाजवळ नितीन सपकाळे यांच्या शेतातील झाडाला हातरूमालाने जगदीश बारेला याने गळफास घेतल्याचे सकाळी ९ वाजता उघडकीला आले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार, सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे, साहेबराव पाटील, ज्ञानेश्वर कोळी, जयेंद्रसिंग पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.