जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील रहिवासी आतीश रवींद्र खरात याला पोलीस प्रशासनाने संघटीत गुन्हेगारीच्या कायद्याअंतर्गत एमपीडीएद्वारे एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. भुसावळातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांच्या विरोधात हद्दपारी, एमपीडीए आदी कार्यवाहींच्या माध्यमातून धडक मोहिम सुरू केली आहे.
यात आता आतीश रवींद्र खरात (वय २५, रा. समता नगर, भुसावळ) याच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (केसीएन)या कारवाईमुळे आतीश खरात याला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याला ठाणे येथील कारागृहात एक वर्ष स्थानबध्द करण्यात येणार आहे.
आतिश खरात याचा दि. ८ एप्रिल २०२४ रोजी हद्दपार प्रस्ताव पाठवण्यात आला होता. चौकशी दरम्यान अतिशने दि. ११ एप्रिल रोजी दखलपात्र गुन्हा केल्यामुळे त्याचे विरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव भुसावळ शहर पोलीस स्टेशनने पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावावर आता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मान्यता दिली आहे.
आतिश खरात याच्यावर भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे तर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट व इतर कलमानुसार १ गुन्हा दाखल आहे. (केसीएन)भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रस्तावावर कामकाज केले. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील दामोदरे, युनूस शेख यांनी कार्यवाही केली.