जळगाव शहरात असोदा रस्त्यावर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात अवैधपणे घरगुती गॅसचा काळाबाजार करून खासगी वाहनामध्ये भरणाऱ्या तीन जणांवर शनिपेठ पोलिसांनी मंगळवारी १७ जून रोजी दुपारी दीड वाजता कारवाई करत तब्बल ६१ सिलेंडर ताब्यात घेतले आहे. यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरचा असल्याचे समोर आले असून याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कासोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याची गोपनीय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली.(केसीएन)त्यानुसार त्यांनी मंगळवारी दि. १७ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पथकाला कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाई मध्ये पोलिसांनी ३३ घरगुती गॅस सिलेंडर आणि २८ व्यावसायिक गॅस सिलेंडर असे एकूण ६१ सिलेंडर जप्त केले आहे. तसेच या ज्या काळाबाजार करण्यासाठी लागणारे साहित्य यात वजन काटा आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे वाहन देखील जप्त केले आहे.
याप्रकरणी राहुल नारायण सोनवणे (वय-२९), राकेश नारायण सोनवणे (वय-२५ दोन्ही रा. पिवळ्या भिंती, मोहन टॉकीज परिसर, जळगाव) आणि आदेश राजू पाटील (वय-२३ रा. मोहन टॉकीज परिसर, जळगाव) यांच्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शशिकांत पाटील प्रदीप नन्नवरे, कमलेश पाटील, गजानन वाघ, विकी इंगळे, योगेश साबळे, अमोल वंजारी, निलेश घुगे, नवजीत चौधरी, पराग दुसाने यांनी केली आहे.