जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील वृध्द सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आमीष दाखवून ६१ लाख रूपयांचा गंडा घालणार्या दोघा भामट्यांना सायबर शाखेच्या पथकाने दिल्लीतून पकडले आहे.
सेवानिवृत्त कृषी अधिकारी टिकाराम भोळे (वय ८८, रा. विद्युत कॉलनी) यांना २०१७ मध्ये दीपिका शर्मा नावाच्या महिलेने मोबाइलवर स्टार हेल्थ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे एलआयसी कंपनीकडे १ लाख ९५ हजार रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम परत हवी असल्यास मी सांगेन तशी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे सांगून त्याच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो व २४ हजार २७० रुपयांचा धनादेश त्यांच्याकडून पोस्टाने मागवून घेतला. रॅल हेल्थ इन्शुरन्स कंपनीत ४ लाख ७५ हजार रुपये बाकी असल्याचे सांगून ४० हजार रुपयांची मागणी केली. या माध्यमातून समोरच्यांनी त्यांना ६१ लाख ७९ हजार ५९३ रूपयांचा गंडा घातला.
टिकाराम शंकर भोळे यांनी सायबर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. सायबर पथकाने संबंधित बँक अकाउंट, पत्ते यांची तांत्रिक चौकशी केली. संबंधित भामटे दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. पो नि लीलाधर कानडे, उपनिरीक्षक अंगद नेमाने, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, पंकज वराडे, दीपक सोनवणे, श्रीकांत चव्हाण, सचिन सोनवणे यांच्या पथकाने दिल्ली येथून अमितसिंग देवेंद्रप्रकाश सिंग उर्फ अमित शर्मा मुलचंद शर्मा (रा. मोतीराम रोड, मानसरोवर पार्क, शाहदरा नॉर्थ इस्ट दिल्ली) व लखमीचंद राजेश कुमार (जोहरीपूर, दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.