मोटारसायकल चोरीचे दोन आरोपी नंदुरबारच्या मार्गावर पोलिसांना चकमा देऊन फरार
अमळनेर (प्रतिनिधी ) – पोलिसांना चहाची तलफ चांगलीच महागात पडली आहे. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना नंदुरबार कारागृहात नेत असताना, ते पोलिसांना चकवा देऊन पळून गेले. ही धक्कादायक घटना काल शनिवारी दि .१५ रोजी दुपारी २ ते २:३० वाजताच्या सुमारास दावडे गावाजवळ घडली.

अमळनेर पोलिसांनी शहादा तालुक्यातील सात पिंपरी येथील अंबालाल मोठ्या खर्डे आणि हिंमत उर्फ रेजा पावरा या दोघांना मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून पोलिसांनी तब्बल २४ मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळवले होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

जळगाव कारागृहात जागा उपलब्ध नसल्यामुळे या दोन्ही आरोपींना नंदुरबार कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, अंमळनेर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी त्यांना घेऊन शासकीय वाहनातून नंदुरबारकडे निघाले होते.
नंदुरबारकडे जात असताना, दावडे गावातील एका हॉटेलजवळ पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी थांबले. पोलीस शासकीय वाहनातून उतरून चहापानाचा आस्वाद घेत असताना, आरोपींनी याच संधीचा फायदा घेतला आणि पोलिसांना चकवा देत पळ काढला. आरोपी रस्त्यालगतच्या झाडा झुडपांमध्ये गायब झाले.

घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा, अंमळनेर, धुळे आणि नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तात्काळ परिसरात नाकाबंदी केली आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवली. मात्र, उशिरापर्यंत या दोन्ही फरार आरोपींचा कोणताही थांगपत्ता लागलेला नव्हता. सदर आरोपींचा कसुन पोलिस शोध घेत आहे.









