जामनेर शहरात न्यू इंग्लिश स्कूल येथे उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथे राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रमांतर्गत किशोर वयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत,आशा कुयटे, सिकल सेल कार्यक्रम समन्वयक शिवाली देशमुख ह्या होत्या. वय १० ते वय वर्ष १९ पर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश किशोरवयीन गटात होतो. किशोर वयीन मुला-मुलींना लैगिक शिक्षणाची आवश्यकता का आहे, किशोरवयीन अवस्थेत कोणते शारीरिक व मानसिक बदल होतात, किशोरवयीन वयामध्ये आई-वडील ,पालक यांच्यासोबत संवाद साधणे का गरजेचे आहे, वडीलधाऱ्यांचा सल्ला का गरजेचा आहे, मुलांमध्ये या वयात काय समस्या येतात, मुलींमध्ये काय समस्या येतात, त्यावरील उपाययोजना, याबाबत कार्यक्रमात डॉ.पल्लवी राऊत यांच्याकडून सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच शिवाली देशमुख यांच्याकडून सिकल सेल आजाराबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी आरोग्य विभागाच्या वतीने किशोरवयीन मुलींच्या भावनिक, मानसिक, शारीरीक समस्याविषयी माहितीपत्रक वाटण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु.एन.सुरळकर यांनी तर आभार नलिनी पाटील यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक सुरेश महाजन, एल.एस.वारके, एम.बी.जोशी, आर. इ.इधाटे, रुपेश बावस्कर व मोठया संख्येने किशोरवयीन मुली उपस्थित होत्या.