जामनेर/पाळधी (प्रतिनिधी):- शिरसाळा मारुतीच्या दर्शनासाठी निघालेल्या जामनेर तालुक्यातील पाळधी येथील दोन चुलत भावांचा वाडी किल्ल्याजवळ भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर पहाटे अपघात झाला आणि तब्बल १२ तासांनंतर त्यांचे मृतदेह आढळून आले. शनिवारी (२२ नोव्हेंबर) रात्री उशिरा या दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पहाटे ४ वाजता निघाले अन्…
मयत तरुणांची नावे कल्पेश समाधान माळी (१७) आणि शुभम भिका माळी (२१) (दोघे रा. पाळधी, ता. जामनेर) अशी आहेत. हे दोघे चुलत भाऊ शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाळधीहून शिरसाळा येथील मारुतीरायाच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाले होते.
ते बोदवडकडे जात असताना, मालदाभाडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर दोघे तरुण दुचाकीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात फेकले गेले.
१२ तासांनी मृतदेह आढळले
अपघातानंतर पहाटेच्या वेळी कुणीही त्या रस्त्यावरून न गेल्यामुळे ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. घटनेनंतर तब्बल १२ तासांनी, दुपारी चार वाजेच्या सुमारास हे दोघे घरी न पोहोचल्याने त्यांच्या शोधासाठी कुटुंबीय आणि गल्लीतील तरुण निघाले.
शोध घेत असताना वाडी किल्ल्याजवळ रस्त्यावर त्यांची अपघातग्रस्त दुचाकी आणि रस्त्यालगतच्या नाल्यात दोघेही मृतावस्थेत आढळून आले. डोक्याला व गळ्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे उघड झाले.
दोन तरुण चुलत भावांचा अपघातात मृत्यू झाल्याने पाळधी गावावर शोककळा पसरली आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास या दुर्दैवी भावांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.









