बुलडाणा जिल्ह्यात घडली सिनेस्टाईल घटना, आणखी १ पोलीस जखमी
बुलडाणा (वृत्तसेवा) : दुचाकीवरुन दारुची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी दुचाकीवरून पाठलाग करतांना दारु विक्रेत्याने पोलीसांच्या दुचाकीला लाथ मारल्याने पोलीसाची दुचाकी झाडावर आदळली. या भीषण अपघातात एक पोलीसाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा पोलीस कर्मचारी जबर जखमी झाल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील शेळगाव आटोळा शिवारात रविवारी दि. २३ रोजी घडली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील अवैध दारुचा व्यवसाय करणारा संशयित आरोपी संजय उत्तम शिवणकर हा त्याचा स्वताच्या दुचाकीवरुन अवैधरित्या दारुचे बॉक्स घेऊन जात होता.(केसीएन)ही बाब याच परिसरात कर्तव्यावर असलेले बिट कॉन्स्टेबल भागवत गणेश गिरी व जमादार रामेश्वर अवचित आंधळे यांच्या लक्षात आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित अवैध दारु वाहतूक करणाऱ्या संजय शिवणकर याला थांबायचे सांगितले. मात्र संजय शिवणकर याने गाडी न थांबताच पळ काढला म्हणून रामेश्वर आंधळे व भागात गिरी यांनी त्याचा पाठलाग सुरु केला.
पाठलाग सुरु केल्याचे अवैध दारु वाहतूक करणाऱ्या संजय शिवणकरच्या लक्षात आले व त्याने गाडी जोरात पळवणे सुरु ठेवले म्हणून संबंधित पोलीसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. यावेळी पोलीसांची गाडी जवळ येत संजय असल्याचे लक्षात आले व आता आपण पकडले जाऊ म्हणून संजय शिवणकर याने पोलीसांना काही कळण्याच्या आतच धावत्या दुचाकीवरुन पोलीसांच्या दुचाकीला जोराने लाथ मारली.(केसीएन)अचानक लाथ मारल्याने पोलीसांचा गाडीवरील ताबा सुटला व दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोराने आदळली. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल भागवत गिरी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर बिट जमादार रामेश्वर आंधळे हे जबर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारार्थ जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले आहे.
वरील घटना ही देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर या गावापासून काही अंतरावर असलेल्या शेळगाव आटोळा शिवारात घडली असून या घटनेत शिनगाव जहागीर येथील अवैध दारुची वाहतूक व विक्री करणाऱ्या संजय उत्तम शिवणकर यास अटक करुन त्याच्या विरोधात अवैध दारु वाहतूक व विक्री व पोलीसांवर हल्ला करणे या कलमाखाली रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयत पोलीस भागवत गिरी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.