एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून दोन आरोपींसह एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.


जळगाव शहरातील अयोध्या नगर येथील रहिवासी पंढरीनाथ पाटील हे सहकुटुंब धानवड (ता. जि. जळगाव) येथे गावी गेले होते. दि. ०२/०२/२०२६ रोजी सकाळी त्यांच्या बंद घराचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांनी त्यांना फोनवरून कळवले. पाटील यांनी घरी येऊन पाहणी केली असता, कपाटाचे ड्रॉवर उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तपासासाठी विशेष पथक नेमले होते. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, हे आरोपी मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पुनासा तहसील अंतर्गत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. यात सुखदेव रामसिंग टाक (वय ३६), आकाश दिनेश वाधे (वय १९), एक विधीसंघर्ष बालक यांना अटक झाली.
आरोपींकडून चोरी गेलेले १९ ग्रॅम सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेले ४ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन, लोखंडी पकड, स्क्रू-ड्रायव्हर आणि एक लहान चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस पथकाने यशस्वी केली.









