जळगाव ( प्रतिनिधी ) – ओरिसातील कटक येथे १३ व्या आंतरराष्ट्रीय कटक महोत्सवात कथ्थक नृत्य नैपुण्यासाठी जास्मिन गाजरे यांना “नृत्य गरिमा” आणि “नृत्य शिरोमणी” या दोन सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले.
ओरिसा राज्यातील कटक येथे ३ ते ९ जानेवारी या कालावधीत मानाच्या १३ व्या आंतरराष्ट्रीय कटक महोत्सवात जळगावच्या गंधर्वि कथक नृत्यालयाच्या संचालिका जास्मिन गाजरे यांनी त्याच्या शिष्या हिमानी महाजन, महेक फुलवानी, निलाक्षी चौधरी आणि रुद्राक्षी शिंदे यांच्या समवेत एकल आणि सामूहिक कथक नृत्य सादर केले. या महोत्सवात जगभरातून वेगवेगळ्या देशांमधील ३६ कलाकार शास्त्रीय नृत्य सादर करण्यासाठी सहभागी झाले होते.
या महोत्सवाचे औचित्य साधत तेथे राष्ट्रीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात सेमी क्लासिकल नृत्य प्रकारात हिमानी महाजन, महेक फुलवानी, रुद्राक्षी शिंदे यांनी आपापल्या वयोगटात प्रथम तर निलाक्षी चौधरी हिने द्वितीय पारितोषिक मिळवत जळगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविले. या विशेष कामगिरीसाठी गंधर्वि कथक नृत्यालयचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
जास्मिन गाजरे यांना “नृत्य गरिमा” आणि “नृत्य शिरोमणी” असे दोन सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले. जगभरातील ३६ भारतीय शास्त्रीय नृत्य कलाकारांतून जास्मिन यांना हे पुरस्कार मिळाले या आधीसुद्धा त्यांना हैदराबाद येथे नृत्यशिखर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.