रावेर (प्रतिनिधी) :- जळगाव विभागीय आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धा रावेर शिक्षण प्रसारक मंडळाचे विठ्ठलराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर येथे संपन्न झाल्या. त्यात एकूण मुलांचे बारा तर महिलांचे सात खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यात नाईक महाविद्यालय, रावेर यांनी महिला व पुरुष संघाचे सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवून हॅट्रिक साधत जनरल चॅम्पीयनशिप पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष म्हणून लाभलेले संस्थेचे सचिव प्रा. एम. सी. कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल, जळगाव विभागाचे सचिव डॉ. गोवींद मार्तडें, उपप्राचार्य प्रा. एस. यु. पाटील, प्रा. संदीप धापसे, रावेर तालुका तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष दिपक नगरे, उपअध्यक्ष डॉ. संदीप पाटील, खजीनदार सुरेश महाजन, निवड समीती सदस्य डॉ. मुकेश पवार, डॉ. महेश पाटील, प्रा. भालोदकर, क्रीडा समीतीचे सदस्य प्रा. व्ही बी पाटील, प्रा. चतुर गाढे, क्रीडा संचालक उमेश पाटील, तालुका सचीव जीवन महाजन, प्रा. गोविंद साबळे इत्यादी उपस्थीत होते.
स्पर्धा अतिशय जल्लोषात पार पडली. मुलांच्या गटात प्रथम – नाईक महा., रावेर, द्वितीय – धनाजी नाना महा. फैजपुर, तृतीय के.सी.ई.चे आयएमआर महा. ,जळगाव यांनी यश मिळविले. मुलींच्या गटात प्रथम – नाईक महा. रावेर, द्वितीय – गरूड महा., शेंदुर्णी, तृतीय – धनाजी नाना महा.फैजपुर यांना पारितोषिक मिळाले. सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे जयेश बाविस्कर, निकेतन खोडके, अमोल जाधव, जयेश कासार इत्यादींनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. उमेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. चतुर गाढे यांनी केले.