जळगाव ( प्रतिनिधी ) – महापौर निवडणुकीत शिवसेनेला साथ दिलेल्या गटातील ३ नगरसेवकांनी नुकतीच भाजपमध्ये घरवापसी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता शहरातील राजकीय डावपेचांनी आता वेग आला आहे . आणखी ७ नगरसेवक आता भाजपमध्ये माघारीसाठी उत्सुक असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे?

पूर्ण बहुमतात जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता असून पण नगरसेवकांचा एक मोठा गट फुटल्याने शिवसेनेच्या महापौर विजयी झाल्या होत्या . त्यावेळी राज्यात ही राजकीय उलथापालथ चर्चेचा विषय ठरली होती .
त्यानंतर या फुटलेल्या नगरसेवकांची तक्रार भाजपने विभागीय आयुक्तांकडे केली होती . त्यानंतर प्रभाग समिती सभापती निवडणूक झाल्या .तेंव्हापासून पुन्हा शहरातील राजकारणाची हवा तापायला लागली होती . राजकीय पक्षांतर आणि कायद्यातील तरतुदीच्या कचाट्यात सापडून आपले नागरसेवकपद जाऊ नये म्हणून सगळ्याच नगरसेवकांनी सावधगिरीचा पावित्रा घेतला . काहींना आपण आपल्या भागातील लोकांच्या कामांबाबत असलेल्या अपेक्षा महापालिकेकडून पूर्ण होण्याबद्द्दल शंका वाटू लागल्याने पुढे लोकांपुढे कसे जायचे याचीही चिंता सतावते आहे . त्यामुळे राजकारण म्हणून नसत्या भानगडी मागे लागू नयेत अशी मनस्थिती तयार झाल्याने आधी शिवसेनेला साथ देणारे नगरसेवक पुन्हा जाहीरपणे भाजपलाच जवळ करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे .
या डावपेचांमध्ये मुख्य भूमिका पुन्हा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची राहणार असल्याने आता त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटलांशी कलगीतुरा रंगणार हे मात्र निश्चित आहे . गेल्या १० वर्षांपासून महापालिका कामांबद्दल लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेली नाही. हे वास्तव पुढे करून लोक नगरसेवकांना जाब विचारात असताना सत्ता वर्चस्वाचा हा खेळ आता भाजप कोणत्या डावपेचांनी आपल्या बाजूने वळवणार ; यावरच पुन्हा भाजपमध्ये माघारी येणाऱ्या नगरसेवकांचा आकडा अवलंबून राहणार आहे असेही सांगितले जात आहे.







