दिव्यांग बांधवाना ई-सायकल वाटप
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील ४ हजार ९६ अंगणवाडी सेविकांना जिल्हा परिषदेतर्फे जळगावात बुधवारी दि. ६ मार्च रोजी स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांना देखील डिजिटल ई-सायकलचे वाटप करण्यात आले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, महिला बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केले. अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झालेल्या स्मार्टफोनमुळे अंगणवाड्यांमधील बालके तसेच कुपोषित बालकांबाबतची मूलभूत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यास वाव मिळाला असल्याचेही अंकित यांनी यावेळी सांगितले. महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प संचालक देवेंद्र राऊत यांनी मनोगतात सांगितले की केंद्र शासनाच्या पोषण आहार योजनेअंतर्गत ४ हजार ९६ स्मार्टफोन जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झाले आहेत. या स्मार्टफोनच्या माध्यमातून बालकांची उपस्थिती आहाराचे वाटप तसेच कुपोषणाच्या नोंदी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येणार आहे.
दिव्यांग बांधवांना मिळाला वेगवान पाय
या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना सायकलचे वितरण करण्यात आले आहे. ई -सायकलच्या माध्यमातून हाताने सायकल चालवण्याच्या मोठ्या विक्रीच्या समस्येतून दिव्यांग बांधव मुक्त होणार आहेत. उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायकलच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे. आता त्यांचा वेग वाढला आहे. त्यांच्यात मोठा आत्मविश्वास आला आहे.