पोलीस कर्मचारी विशवनाथ गायकवाडची विभागीय चौकशी सुरु
जळगाव (प्रतिनिधी ) – सध्या जळगाव तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय फोफावला असून मोठा आर्थिक फायदा होत असल्याने अनेक जण या धंद्यात उतरून स्वतःला वाळू माफिया म्हणवून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे या व्यवसायात अनेक जण गुंतले असून यात पोलिसही मागे नसल्याने एक पोलीस कर्मचारी स्वतः वाळूचा व्यवसाय चालवीत असल्याचा प्रकार पुढे आल्याने त्याच्यावर चौकशी सुरु असेपर्यंत निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केली असून अशी माहिती आज पत्रकारांशी संवाद साधतांना दिली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अवैध वाळूप्रश्नी लक्ष घातले आहे. त्यामुळे अवैध वाळू कारवाईंना वेग येत आहे. तालुक्यातील दापोरा येथे पोलीस कर्मचारी स्वतःच वाळू ठेका चालवित असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार तालुका पोलीस स्टेशनचे प्रोबेशनरी अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी धडक कारवाई करून दापोरा येथे ७ ते ८ ट्रॅक्टर अवैध वाळू पोलिसांनी जप्त केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, पोलिसांना ऑनलाईन केलेल्या तक्रारीवरून हि माहिती समोर आली असून त्यात, तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत विश्वनाथ गायकवाड यांचे वाळू वाहतूकदारांशी संबंध असून त्याचे स्वतःचे एक ट्रॅक्टर दुसऱ्याच्या नावावर घेतलेले आढळून आले आहे. त्यामुळे विशवनाथ गायकवाड यांच्या कारनाम्यामुळे खाकी डागाळली असून काही तथा कथितांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान विश्वनाथ गायकवाड याचे कोणाशी आणि कोणकोणत्या व्यवसायात लागेबांधे आणि गुंतवणूक आहे , त्याच्या नावावर उप प्रादेशिक कार्यालय येथे चौकशी करून त्याच्या नावावर आणखी ट्रॅक्टर आहेत का ? याबाबत चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले .