अफू वाहतुकीतील ‘वॉचर’ म्हणून काम करणारे राजस्थानचे २ संशयित जेरबंद
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
जळगांव ( प्रतिनिधी ) – चोपडा ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई करत अफूची वाहतूक करणाऱ्या टोळीतील दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. हे संशयित मुख्य वाहनाच्या पुढे ‘वॉचर’ म्हणून काम करत असल्याचे तपासात दिसून आले आहे.
मध्य प्रदेशातील पारउमर्टी गावाच्या सीमेला लागून असलेल्या चोपडा तालुक्यातील उमर्टी गावाजवळून अवैध गावठी कट्टे, गांजा, दारू, गुटखा इत्यादींची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते. या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी गेल्या एका महिन्यापासून जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या संकल्पनेतून उमर्टी आणि सत्रासेन परिसरात २४x७ नाकाबंदी लावण्यात आली आहे.
आज दिनांक २५ जुलै रोजी सत्रासेन नाक्यावर नाकाबंदी ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार रावसाहेब एकनाथ पाटील आणि सहायक फौजदार शिवाजी वाविस्कर यांना उमर्टी नाक्याकडून सत्रासेनच्या दिशेने दोन संशयित वाहने येताना दिसली.
त्यांनी पहिले वाहन एक स्विफ्ट कार (क्रमांक जीजे ०६ एल एस ००७५) थांबवले. वाहन तपासत असतानाच, पाठीमागील महिंद्रा कार (क्र. एमएच १२ एलडी ८१४१) मधील व्यक्तींना नाकाबंदी सुरू असल्याचे समजले आणि त्यांनी वाहन मागे फिरवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी, तपासणीसाठी थांबवलेल्या स्विफ्ट कारने नाकाबंदीसाठी लावलेला लोखंडी अडथळा तोडून पळ काढला.
पोलीस हवालदार रावसाहेब एकनाथ पाटील आणि सहायक फौजदार शिवाजी वाविस्कर यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अनिल विठ्ठल भवारी यांना दिली.
माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक भवारी यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले पोलीस हवालदार चेतन महाजन किरण पारधी, किशोर माळी यांना सोबत घेऊन तातडीने लासुर ते हातेड रस्त्यावर धाव घेतली. तेथील स्थानिक नागरिक नरेंद्र मोरे आणि प्रमोद शिरसाठ यांच्या मदतीने नाकाबंदी करून सत्रासेन नाक्यावरून लोखंडी अडथळा तोडून पळून आलेल्या स्विफ्ट कार आणि त्यातील दोन व्यक्तींना पकडले.
चौकशी केली असता, त्यांची नावे पांचाराम सोनाराम विश्नोई (रा. उदासर, ता. गुडामालाणे, जि. वडमोर, राजस्थान) आणि सुरेशकुमार गोपालराम कुमार (रा. रणोदर, ता. चितलवाडा, जि. जालोर, राजस्थान) अशी निष्पन्न झाली. संशयित आरोपींनी सांगितले की, ते त्यांच्या पाठीमागे असलेल्या महिंद्रा कार या अफूची वाहतूक करणाऱ्या गाडीसाठी ‘वॉचर’ म्हणून पुढे-पुढे चालत होते. त्यांना हे देखील कळाले की, ती महिंद्रा कार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोटेक येथे अपघात होऊन पलटी झाली आहे आणि त्यात अफूच्या झाडाची बोंडे आढळून आली आहेत. धुळे जिल्ह्यातील सांगवी पोलिसांनी त्या वाहनावर पुढील कारवाई सुरू केली आहे.
त्यामुळे, चोपडा पोलिसांनी पकडलेल्या स्विफ्ट कारमधील दोन्ही संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी सांगवी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस, जिल्हा धुळे करत आहेत.