मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयला मदत करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांची जी एक फॉरेन्सिक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा काल दिला आहे.
दरम्यान, एम्स रुग्णालयाच्या अहवालाबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपलं व्यक्त केलं आहे. ‘आमच्याकडे एम्स रुग्णालयाकडून अद्याप याबाबत कोणताही अधिकृत अहवाल आलेला नाही. मात्र, वृत्त वाहिन्यांना या अहवालाची माहिती झाली आहे. या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आपल्या तपासात ज्या बाबी आढळल्या होत्या त्याच इथेही आढळून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांचा आणि कूपर रुग्णालयाचा तपास योग्य होता. या तपासावरुन आमच्यावर खूप आरोप झाले. मात्र, एम्सच्या अहवालानं हे सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत.’ असं परमबीर सिंग म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल वृत्त दिले आहे.
सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांत याला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप केला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत आपल्याच निवासस्थान मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडीयावर काही गटांनी सध्या मोठीच मोहीम चालवली असतानाच हा अहवाल आल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.