संसारातील प्रत्येक जीवांकडून काही ना काही चुका होत असतात. ती चुक लहान असो की मोठी असो त्याविषयी गुरूंकडे आलोचना करा, त्यामुळे माया, वेदान, मिथ्या हे तीन शल्य जे मोक्ष मार्गात मुख्य अडथळे असतात ते दूर होऊ शकतात. आनंदी संसारासाठी ही शल्य दूर केली पाहिजेत. बाहेरील शल्य म्हणजे आपल्याला एखादा काटा टुचल्यानंतर जो त्रास होतो त्यापासून तो काढल्यानंतर लगेच आपल्याला आराम मिळतो. त्याप्रमाणे मनातील आंतरिक वेदनांचे कारण म्हणजे वरील तीन महाशल्य आहेत. ‘आलोचना’, लोचन म्हणजे पाहणे, गुरूंसमोर आपल्याकडून झालेल्या चुकांची स्विकृती करणे म्हणजे आलोचना होय. असे केल्याने मानसिक प्रसन्नता, मोक्षमार्ग प्रशस्त होतो. माया, वेदान, मिथ्या दर्शनातून मुक्त व्हावे असा सल्ला आज धर्मसभेत शासनदीपक प. पु. सुमितमुनिजी महाराज यांनी श्रावक-श्राविकांना दिला.
आरंभी प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म.सा. यांनी विचार प्रकट केले, त्यात त्यांनी मैत्रभाव विकसीत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. विनय, विश्वास आणि प्रेम ह्यातून मैत्रभाव वाढत जातो. मैत्रभाव ही संकल्पना खूप व्यापक आहे. तशी दृष्टी हवी. आपल्या गुणदोषांसह स्विकार करणे म्हणजे मैत्री, अशी मैत्री वर्तमानात कुठेही दिसत नाही. मैत्री ही फक्त स्वार्थासाठी केली जात आहे. ती निस्वार्थ असावी. वडिल-मुलं, बहिण-भाऊ, पति-पत्नि यासह कुठल्याही नात्यात मैत्र भाव सध्या दिसत नाही. त्यामुळेच एकटेपणा वाढत आहे. बाहेरील नकारात्मक वातावरण घरात येऊन ताण-तणाव आणि कुटुंबातील नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. मैत्रभाव नसेल तर अहिंसा साधना होऊ शकत नाही. आत्महितासोबतच दुसऱ्याच्या हिताचा कल्याणाचा विचार करता येत नाही यावर आत्मचिंतन केले पाहिजे असे सुद्धा त्यांनी सांगितले.