राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा पवारांकडे दिला राजीनामा ?
जळगाव (प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विधान परिषदेतील गटनेते एकनाथराव खडसे यांची शनिवारी दि. ६ एप्रिल रोजी संध्याकाळी घर वापसी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या तीन वर्षापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील भाजपमधील वातावरण पूर्णपणे बदलणार आहे. त्यांना राज्यपाल म्हणून जबाबदारी दिली जाणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
एकनाथराव खडसे गेल्या चाळीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षात होते. त्यानंतर त्यांच्यावर मागील दशकात सातत्याने विविध चौकशी व आरोप यांच्या माध्यमातून त्यांना निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. म्हणून त्यांनी २३ ऑक्टोंबर २०२० रोजी गेल्या तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांना विधान परिषदेवर गटनेते म्हणून पक्षाने जबाबदारी दिली होती. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अशी त्यांची ओळख होती.
आता शनिवारी संध्याकाळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये घर वापसी होत आहे. शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच विधान परिषदेतील आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर आता भाजपामध्ये प्रवेश करीत आहे.
दरम्यान एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील समीकरणे पूर्णपणे बदलून जाणार आहे. तीन वर्षांमध्ये एकनाथराव खडसे व गिरीश महाजन तसेच मंगेश चव्हाण यांच्यामध्ये प्रचंड शाब्दिक शीतयुद्ध रंगले होते. अक्षरशा खालच्या पातळीवरील शब्द देखील उच्चारण्यात आले होते. आता एकनाथराव खडसे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना पक्ष काय जबाबदारी देणार आहे, याकडे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात लक्ष लागून आहे.