शनिपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरु
जळगाव (प्रतिनिधी) :- अशोक नगर येथील तरुणाचा अनैतिक संबंधाच्या वादातून खून झाला होता. पोलीस तपासात मयत तरुणाने संशयित आरोपीला मारहाण केल्याच्या रागातून हा खून त्याने केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेत गोळीबाराचा प्रयत्न झाला असून याप्रकरणी अटक असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघ संशयितांकडून कोयता, चॉपरसह गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी संशयितांपैकी एकाने आकाशवर गोळी झाडली, मात्र ती अडकून पडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
आकाश पंडीत भावसार (वय २७, रा. अशोक नगर) याचा खून करण्यात आला होता. वारंवार पत्नीच्या संपर्कात असलेल्या अजय मोरे याला मयत आकाश भावसार याने दोन ते तीन वेळा मारहाण केल्याचा राग अजयच्या मनात होता. खूनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास संशयित अजय मोरे, चेतन रविंद्र सोनार व कुणाल उर्फ सोनू चौधरी यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांनी दारु पिले होते. त्यानंतर तेथूनच ते अशोक नगरात असलेल्या आकाशच्या घरी गेले. त्यांना आकाश हा कालिंका माता मंदिराजवळील भरीत सेंटरजवळ असल्याचे माहित पडताच ते त्याठिकाणी गेले. दुचाकीवर आलेल्यांपैकी कुणाल उर्फ सोनू चौधरी याने त्याच्याजवळील गावठी कट्टूयातून आकाशवर गोळी झाडली.
मात्र ती बंदूकीतच अडकून पडल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्यांनी धारदार कोयत्यासह चॉपरने आकाशवर सपासप वार करीत त्याची निर्घृण हत्या केली. खूनाच्या दिवशी संशयित हल्लेखोरांनी आकाशवर फायरींग केल्याची देखील चर्चा होती. त्यानुसार शनिपेठ पोलीसांकडून त्या दृष्टीने देखील तपास केला जात होता. संशयितांना दि. १३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी असल्यामुळे खूनात वापरलेल्या पोलिस कोठडीत त्यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यारांसह गावठी पिस्तुल देखील जप्त केली आहे. त्यांना न्यायालयाने दि. १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे.