नातेवाईक, मित्रांकडे लपून बसले असताना संशयीतांवर पोलिसांची झडप
जळगाव (प्रतिनिधी) : येथील अशोक नगर भागातील रहिवासी तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावर ए वन भरीत सेंटरजवळ धारदार शस्त्रांनी वार करून शनिवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चार संशयित आरोपींना शिताफिने ताब्यात घेऊन अटक केली आहे.
आकाश पंडित भावसार (वय २७, रा. अशोक नगर,जळगाव) या तरुणाच्या खून प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशची आई कोकिळाबाई भावसार यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय मंगेश मोरे यांच्यासह ४ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.(केसीएन)त्यानुसार शनिपेठ पोलीस स्टेशनसह जळगाव एलसीबीची टीम संशयित आरोपींच्या मागावर लागली होती. २४ तासांच्या आत जळगाव एलसीबीने याबाबत तपास करून ४ जणांना अटक केली आहे. यातील काही जण मित्रांकडे तर काही जण नातेवाईकांकडे लपून बसले असल्याचे एलसीबीला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीवरून कळाले होते.
त्यानुसार अजय मंगेश मोरे (वय २८, कासमवाडी, जळगाव) याचेसह ३ अल्पवयीन या ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी कुणाल उर्फ सोनू चौधरी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान जिल्हाभरात खुनाच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश राहिला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.