मुलांमध्ये दिल्लीचा दक्ष गोयल, गुजरातचा जीहान शाह, महाराष्ट्राचा पारस भोईर संयुक्तपणे तर मुलींमध्ये मृत्तिका मल्लिक निर्विवादपणे आघाडीवर
जळगाव ( प्रतिनिधी ) – अनुभूती निवासी स्कूल सुरू असलेल्या राष्ट्रीय सबज्युनीअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आठव्या दिवशी दहाव्या फेरीचे सामने खेळवण्यात आले. यावेळी झालेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये स्पर्धकांनी आपल्या बुद्धीचा कस लावत अत्यंत महत्वाच्या गुणाला गवसणी घालण्यासाठी अतोनात प्रयत्न केल्याचे दिसले.
मुलांमध्ये दहाव्या फेरीत खुल्या गटातील पहिल्या पटावरील खेळल्या गेलेल्या सामन्यात पांढऱ्या सोंगट्याकडून खेळताना इम्रानने लंडन पद्धतीत आपल्या मोहऱ्यांचा विकास केला. पण कमकुवत झालेल्या ई ४ घराचा फायदा न उचलता आल्याने दिल्लीच्या दक्षने वर्चस्वाची संधी गमावली, जास्त मोहऱ्यांच्या अदलाबदली मुळे डाव हत्तीच्या अंतिम स्थिती कडे झुकला आणि अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत राहिला. तर दुसऱ्या पटावर जिहान शाहने अदक बिवोर विरुद्ध खेळताना डावाच्या मध्यभागी जोरदार मुसंडी मारत आपल्या वजीर आणि हत्तीला पहिल्या आणि दुसऱ्या आडव्या पट्टीवर ताबा वाढवत उंटाला अडकवून टाकले व पांढऱ्या सोंगट्यांचा समन्वय तोडत महत्त्वाचा डाव आपल्या नावावर केला.
तिसऱ्या पटावर महाराष्ट्राच्या पारसने वत्सलचा सिसिलियन बचाव मोडून काढत ओपनिंग मध्येच प्याद्याची बढत घेतली. मिडलगेम मध्ये वजिराची मारामारी करत, घोड्याला फ ५ जागेवर नेऊन अचूक तांत्रिक खेळ करत, खेळाला कलाटणी देत डाव आपल्या नावावर केला. चौथ्या पटावर प.बंगालच्या सम्यक धारेवाने तेलंगणाच्या मोक्षिथ पासुपुलेतीच्या कमकुवत काळ्या घरांचा फायदा घेत सी पट्टीतील आणि ई पट्टीतील प्यादे आपल्या ताब्यात घेतले, आपल्या प्यादांना पुढे पुढे ढकलत दबाव वाढवला आणि डाव सहजपणे जिंकला. पाचव्या पटावर कुशाग्र जैन व माधवेंद्रा मधील सामना मध्ये पटावरील स्थिती ३ वेळा एकसारखी आल्याने अनिर्णीत घोषित करावी लागली.
दरम्यान दहाव्या फेरिअखेर दिल्लीचा दक्ष गोयल, गुजरातचा जीहान शाह, महाराष्ट्राचा पारस भोईर संयुक्त पणे प्रथम क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर साडे सात गुणांसह सम्यक धरेवा व इम्रान असून तब्बल नऊ खेळाडू ७ गुणांसह तृतीय स्थानांवर आहेत.
मुलींच्या गटात पहिल्या पटावर मृत्तिका मल्लिक ने सिसिलियन बचावाचा वापर करून विरुद्ध दिशेला राजाला संरक्षित केले, सामान्यत अशा परिस्थितीत आक्रमण हे एकमेव हत्यार योग्य समजले जाते. आपल्या तीन प्यादे व हत्तीचा आक्रमक वापर करून पांढरा राजाची बाजू मृत्तिका ने खिळखिळी केली आणि अक्षया साथी बरोबर विजय संपादन करून स्पर्धेतील विजेते पदावरील दावा पक्का केला. तिसऱ्या पटावरील साची जैन ने शुभि गुप्ता चा खळबळजनक पराभव केला, शुभि च्या वजिराच्या अनेक चाली चुकल्यामुळे शेवटी तिला पराभवाचा सामना करावा लागला.
चौथ्या पटावर संनिद्धी ने सुरवातीच्या भागात आपली परिस्थिती वरील पकड मजबूत केली, पण मिडलगेम मध्ये खेळलेल्या हत्तीच्या डी ३ चुकीमुळे व ए ७ ते जी १ या कमकुवत तिरप्या पट्टीमुळे सी ४ वर येणाऱ्या काळ्या प्याद्याची चाल व त्यानंतर वजिराला सी ५ घरावर येणाऱ्या स्नेहा हळदर आकस्मात चाली मुळे संनिद्धी च्या विजेतेपदाच्या स्वप्नांवर पाणी फिरले आणि अवघ्या ३९ चालितच डाव संपला. अनुपमा श्रीकुमार ने डावाच्या सुरवातीला आक्रमकता दाखवून वजिराला जिंकले पण उंटाच्या फ ४ व वजिराने हत्तीला मारण्याची चूक तिला महागात पडली शेराली पटनाईक ने कुठलीही चूक न करता डाव खिशात घातला.
दहाव्या फेरिअखेर मृत्तिका निर्विवाद पणे साडे आठ गुणांसह आघाडीवर असून, साडे सात गुणांसह साची जैन, शेरालि पटनाईक, स्नेहा हळदर द्वितीय स्थानांवर आहेत. तसेच अजून तब्बल सात खेळाडू सात गुणांसह निवडीसाठी निकराने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आज स्पर्धेचा शेवटच्या दिवशी एकूणच अंतिम गुणतालिका गुंतागुंतीची होणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही गटातील विजेतेपद व संघ निवडीमध्ये कोणाला समाविष्ट केले जाईल याकडे आता संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिले आहे.
आज अंतिम फेरी…
आज अंतिम फेरीचा खेळ होणार असल्याने खेळाडूंमध्ये त्याविषयीची कमालीची उत्सुकता काल दिसून आली. तब्बल ९ दिवस एकमेकांच्या सोबत राहिलेले अनेक राज्यातील खेळाडूंचे मैत्रीचे नातेही यातून खेळाच्या प्रांगणात पाहायला मिळाले. आपल्या सामन्यांबद्दलचे बारकावे व चालींच्या चर्चेव्यतिरिक्त भारतीय “अनेकता मे एकता” याचेही दर्शन झाले.
राज्यभरातील मान्यवरांची होती उपस्थिती…
आठव्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली. त्यात पालघर येथून महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव निनाद पेडणेकर, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे खजिनदार विलास म्हात्रे, अहमदनगर जिल्हा चेस सर्कल चे सचिव यशवंत बापट व पालघर जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार विवेक उधारे आदि मान्यवरांसह चिफ अरबिटर देबाशिष बरुआ, जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार नंदलाल गादिया हे उपस्थित होते