लहान मुलांचे खेळण्यावरून वाद ; अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाल्यानंतर १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वृद्ध व्यक्ती आणि तरुणावर फायटरने गंभीर वार करीत जखमी केले आहे. तसेच या अल्पवयीन मुलाच्या आईने तिच्या मुलाच्या गुन्ह्याला प्रोत्साहन देत जखमी तरुणाला धरून ठेवले. नंतर या मुलाने फायटरने वार केले. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा गिरीश वर्मा (वय २१, रा. जुनानी भवन, स्टेशन रोड, अमळनेर) असे फिर्यादी दिलेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा वर्मा यांचा चुलत भाऊ हा घराबाहेर मुलांमध्ये खेळत असताना त्याचे काही मुलांसोबत वाद झाले. तेव्हा ज्या मुलामध्ये तो खेळत होता त्याचा मोठा भाऊ पंधरा वर्षाचा अल्पवयीन मुलाने फिर्यादी कृष्णा वर्मा यांच्या आजोबाला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी कृष्णा वर्मा हा संशयित अल्पवयीन मुलाच्या घरी गेला असता तेथे त्याने कृष्णा याला छातीवर लाथ मारून ढकलून दिले. तसेच या अल्पवयीन मुलाने त्याच्या खिशातून फायटर काढले. अल्पवयीन मुलाची आई संशयित आरोपी योगिता भाविक सरवैया (वय ३५ वर्ष,रा. स्टेशन रोड, अमळनेर) फिर्यादी कृष्णा वर्मा याला धरून ठेवले व तिच्या अल्पवयीन मुलाने फायटरने तरुणाच्या डोक्यावर, डाव्या डोळ्यावर, कानावर मारून गंभीर जखमी केले.
आजुबाजूच्या नागरिकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे हे करीत आहेत.