अमळनेर शहरातील रात्रीची घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील तिरंगा चौकात दुकानाला अचानक आग लागून ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ३१ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. आग विझवताना अग्निशमन दलाच्या तिघांना विजेचा धक्का बसला. मात्र सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
भाऊसाहेब गुलाबराव महाजन यांचे तिरंगा चौकात कांचन कॉस्मेटिक व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. ३१ रोजी रात्री त्यांना शेजारील हेमनदास पंजाबी यांचा फोन आला की दुकानातून धूर निघत आहे. भाऊसाहेब महाजन दुकानावर पोहचले. त्यांनी शटर उघडले असता मोठ्या ज्वाळा निघत होत्या. आगीचे रौद्र रूप पाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे नितीन खैरनार, दिनेश बिन्हाडे, जफर खान, फारुख शेख, आनंदा झिम्बल, मच्छिंद्र चौधरी, परेश उदेवाल आग विझवत होते. यावेळी वीजपुरवठा बंद करण्यासाठी महावितरण कंपनीला फोन करण्यात आला.
आगीत वीज जोडणी उघडी पडल्याने उघडया वायरवर पाण्याचा फवारा जाताच स्पार्किंग झाले आणि नितीन खैरनार, दिनेश बिन्हाडे, मछिंद्र चौधरी या तियांना विजेचा शॉक बसला. सुदैवाने त्याचे प्राण बचावले. त्यानंतर काही वेळात वीजपुरवठा बंद करण्यात आला आणि संपूर्ण आग विझवण्यात आली. शेजारच्या दुकानामधील साहित्य बाहेर काढण्यात आले. आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की, आग विझवण्यासाठी तीन बंब बोलावण्यात आले होते. दुकानातील सर्व कॉस्मेटिक व प्लास्टिक साहित्य जळून ५० हजाराचे नुकसान झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे, रवींद्र पाटील यांनी भेट दिली. अमळनेर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत.