चर्चा झाल्यास मनसे, काँग्रेसलाही सामावून घेणार
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमधील घटक शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची सकारात्मक चर्चा झाली असून एकत्र निवडणूक लढणार आहेत. यामध्ये शिवसेनेला ३८ तर राष्ट्रवादीला ३७ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये दोन्ही पक्ष हे मनसे आणि काँग्रेसला सामावून घेणार असल्याची माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे भारतीय जनता पक्षातर्फे जागावाटप सूत्राबाबत अस्थिर वातावरण दिसून आले. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला भाजपने अखेरपर्यंत झुलवत ठेवले. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीने रविवारी २८ डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा केली. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ३८ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ३७ जागा देण्याबाबत आता एकमत झाले आहे.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडणूक प्रभारी माजी आ. संतोष चौधरी, महानगराध्यक्ष एजाज मलिक, कार्याध्यक्ष संग्राम सूर्यवंशी, शिवसेना ठाकरे गटातर्फे संपर्क नेते संजय सावंत, माजी खा.उन्मेष पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करणदादा पवार, पीयूष गांधी उपस्थित होते. आम्ही एकत्रितपणे जागा लढवणार असून शिवसेना त्यांच्या कोट्यातून मनसेला तर राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या कोट्यातून काँग्रेस व इतर समविचारी पक्षांना तिकीट देणार असल्याचीही माहिती देण्यात आली.
तसेच जळगाव महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असल्याचा आम्हाला विश्वास असून महापौर आमच्याच महाविकास आघाडीचा राहील अशी माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेमधून महाविकास आघाडीचे नेत्यांचा आत्मविश्वास दिसून आला आहे. त्यामुळे आता संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीची यादी जाहीर होण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी दिली आहे.









