जळगाव शहरातील वाघुळदे नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : वीज मीटरला आग लागून ते जळून खाक होण्यासह तेथे असलेली सायकल व इतर साहित्यही जळाले. ही घटना सोमवारी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी वाघुळुदे नगरमध्ये श्री हाईटस अपार्टमेंटमध्ये घडली. अग्नीशमन दलाच्या बंबाद्वारे आग विझविण्यात आली.
शहरातील पिंप्राळा भागाजवळ असलेल्या वाघुळदे नगरमध्ये श्री हाईटस अपार्टमेंटमधील वीज मीटरला सोमवारी दुपारी आग लागली. त्या वेळी आगीचे लोळ उठले व सर्वत्र धूर पसरला. जिन्याजवळ मीटर असल्याने महिलांना खालीही येता येत नव्हते. त्यामुळे त्या घरांमध्ये अडकल्या. या विषयी अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. त्या वेळी एक बंब दाखल झाला व वीजपुरवठा खंडीत करून आग विझविण्यात आली. तसेच घरात अडकलेल्या महिलांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तेव्हा महिलांनी सुटकेचा निश्वास टाकला.