जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ ते जळगाव दरम्यान महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत आहे. आजारी वडिलांची भेट घेऊन परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री नशिराबाद टोलनाक्या नजीक घडली. मयूर अरुण चौधरी (वय २८, रा. नशिराबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला.
मयूर रेमंड वस्त्रोद्योग कंपनीत कामाला होता. चौधरी कुटुंबीय शिवपूर कन्हाळा (ता. भुसावळ) येथील मूळ रहिवासी आहे. नोकरीच्या निमित्ताने मयूर आई-भावासह दोन वर्षांपूर्वी नशिराबाद येथे स्थलांतरित झाला त्याचे वडील अरुण चौधरी वृद्धापकाळाने सतत आजारी असतात. ते शिवपूर – कन्हाळा येथे राहतात. सोमवारी सुटी टाकून मयूर वडिलांची भेट घेण्यासाठी दुचाकीने (एमएच १९ डीजी ५५७५) मूळगावी गेला होता. वडिलांची भेट घेतल्यावर रात्री घराकडे परतत असताना आठ वाजेच्या सुमारास भुसावळ – जळगाव राेडवरील ओरिएंट सिमेंट कंपनीसमाेर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पेालिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत मयूर व अपघातग्रस्त दुचाकीचे फोटो व्हायरल केले. नशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील यांनी त्याची ओळख पटवली. मयूरच्या मामांसह कुटुंबीयांना कळवल्यावर ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला.