जळगाव (प्रतिनिधी) – येथील रथ चौक परिसरातील उमाळेश्वर महादेव मंदिरात अधिकमासानिमित्त महाआरती करण्यात आली. तसेच, अधिक मासाची महती भाविकांना सांगण्यात आली. यावेळी भाविकांनी उमाळेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन निरोगी आयुष्यासाठी कामना केली.
सध्या अधिकमास सुरु आहे. या महिन्यात महादेवाची भाविक आराधना करीत आहेत. प्रसिद्ध रथ चौक परिसरातील उमाळेश्वर महादेव मंदिर येथे मंगळवारी १ ऑगस्ट रोजी अधिकमासानिमित्त सामाजिक कार्यकर्ते मनोज भास्करराव पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी महादेवाचे दर्शन घेऊन कामना केली.
पुजारी अमित गुरव यांनी अधिकमासाची माहिती व महत्व भाविकांना विशद केले. अधिकमासास धार्मिक महत्व असून या काळात करण्यासाठी काही व्रते आपल्या धर्मशास्त्रात देण्यात आली आहेत आणि अनेक जण या कालावधीत उपवास सुद्धा करतात.संबंध अधिकमासांत प्रत्येक दिवशी पोथी सकाळी, दुपारी व संध्याकाळी वाचावी अगर ऐकावी, असे त्यांनी सांगितले. उपक्रमाचे आयोजन उमाळेश्वर महादेव महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले. परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.