जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये राज्यशासनाच्या आदेशानुसार ५४ डॉक्टरांना रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून यापैकी निम्मे म्हणजे २७ डॉक्टर रुजू झाले आहेत. तर, उर्वरित २७ जणांना रुजू होण्यासाठी मंगळवार दि. १३ ऑक्टोबर हि शेवटची तारीख असून रुजू न झाल्यास त्यांच्यावर सेवेतून निलंबन होण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.
राज्यशासनाच्या आदेशानुसार जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णसेवा देण्यासाठी तब्बल ५४ डॉक्टरांना रुजू होण्याचे आदेश प्राप्त झालेले आहे. हे डॉक्टर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून जळगावात सेवा देण्यासाठी रुजू होणार आहेत. सुरुवातीला फक्त २ डॉक्टर रुजू झाले होते. मात्र, कारवाई होण्याच्या भीतीपोटी सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी २५ डॉक्टरांनी हजार होत, रुजू झाले. या २७ डॉक्टरांमध्ये सहाय्यक प्राध्यापक १०, वैद्यकीय अधिकारी ८, वरिष्ठ निवासी ९ यांचा समावेश आहेत. या २७ डॉक्टरांची निवासाची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये करण्यात आली असून यातील काहींना घरभाडे भत्ता लागू असल्याने ते काही दिवसात खोली घेऊन राहतील, अशी स्थिती आहे.









