जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावातील घटना
जळगाव प्रतिनिधी : तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ रस्त्यावर पायी जात असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
मुकेश अभिसिंग राठोड (वय २१, रा. रामदेववाडी ता. जळगाव) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुकेश हा आपल्या आई-वडिलांसोबत रामदेव वाडी येथे राहत होता आणि बांधकाम बिगारीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मुकेश हा गावाजवळील दुकानावरून नाश्ता करून आपल्या घराकडे पायी परतत होता.
याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात आणि बेदरकार वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मुकेश गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.









