नवी दिल्ली – दिल्लीस्थित निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित २४ लोक करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील माहिती दिल्लीच्या आरोग्य मंत्री सतेंदर जैन यांनी दिली आहे.
सतेंदर जैन यांनी म्हंटले कि, या धार्मिक कार्यक्रमात जवळपास हजार लोक उपस्थित होते. यातील ३३४ जणांना लोकांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. तर ७०० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मौलानाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मरकजच्या मौलानांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन असतानाही मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आणि त्याची परवानगीही न घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात १५ देशातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दिल्लीमध्ये सध्या भितीचं वातावरण आहे. दिल्ली पोलिसांकडून निजामुद्दीनमधील हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच शेकडो लोकांच्या टेस्ट केल्या आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यापैकी २०० जणांना करोनाची लागण झाल्याची भिती वर्तवण्यात येत आहे.