मुंबई – आगामी काळात 1 महिन्याच्या आत राज्यातील 15-17 हजार रिक्त जागांची पदे भरणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी करोना नियंत्रणासोबतच करोनावरील औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, रिक्त पदांचं आश्वासन आम्ही दिले आहे. त्या भरतीचे धोरण ठरवण्यावर काम सुरु आहे. पूर्वी झालेल्या एकत्रित परीक्षांच्या गुणांवरुन काही पदं भरता येतील का यावर विचार सुरु आहे. कोणत्या पदांसाठी मुलाखती घ्याव्या लागतील यावर धोरण ठरवण्याची प्रक्रिया झाली आहे. पुढील महिन्याभराच्या आत आपल्या सर्व 15-17 हजार पदं भरण्याचे काम केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच राज्य सरकारनेही झपाट्याने अँटीबॉडी चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोविड-19 चाचणीचा निकाल लवकर मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी लवकरच 1 लाख अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विशेषता आवश्यक सेवा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतरांवर ही चाचणी घेण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.
वैद्यकीय परीक्षासंदर्भात केंद्राला विनंती
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. राज्यातील करोना प्रादुर्भावाची सद्य परिस्थिती पाहता या परिक्षा घेणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे या परिक्षा पुढे ढकलण्याची विनंती केंद्राला करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस आधी जाहीर करण्यासह दरवर्षीप्रमाणे दोन पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती टोपे यंनी दिली.







