जळगाव ;-जळगाव;- केंद्र सरकारच्या लहान मोठ्या १५० योजना आहेत. जळगाव मनपा हद्दीत प्रत्येक योजनेची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाने त्याचे गांभीर्य बाळगावे. शहरातील प्रत्येक लोकप्रतिनिधी, नगरसेवकांशी समन्वय ठेऊन योजना प्रभावीपणे राबवा अशा सूचना खा.उन्मेष पाटील यांनी दिल्या. दरम्यान, योजनांचा आढावा घेताना जवळपास ८० कोटींचा निधी मनपाला त्या-त्या योजनेत मिळणार असल्याची बाब खा.पाटील यांनी लक्षात आणून दिली.
महापौर भारती सोनवणे यांनी केंद्राच्या योजनांच्या शहर विकासासाठी लाभ होण्यासाठी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने खा.उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मनपाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.अमृत योजनेच्या कामाचा खा.उन्मेष पाटील यांनी आढावा घेतला असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. एकूण कामांपैकी ४९ टक्के काम होणारच नसल्याचे मक्तेदाराच्या प्रतिनिधीने सांगितले लोकप्रतिनिधी निधी मिळावा यासाठी खूप पाठपुरावा करतात, शासनाशी भांडतात परंतु तुम्ही १०-१० कोटी रुपये समोर असताना ते वाया घालवताय अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारच्या कामाची माहिती जाणून घेण्यासाठी लोक प्रतिनिधी, मक्तेदार, मनपा अधिकाऱ्यांचा एक व्हाट्सअँप ग्रुप तयार करावा. कामाच्या निविदेनुसार असलेल्या कामांपैकी काही कमी कामात उद्दिष्ट साध्य होत असल्याने वाचणाऱ्या निधीतून इतर कामे मार्गी लावावी अशा सूचना दिल्या.
खा.उन्मेष पाटील यांनी ग्रीन सेझ, बायो मायनिंग, एनयूएलएम योजनांचा आढावा घेतला. तसेच शहरातील एलईडी बसविण्याच्या कामाचे काय झाले हे देखील त्यांनी जाणून घेतले. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी एलईडी योजनेचे काम लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली.
समांतर रस्ता, भोईटेनगर उड्डाणपूल, प्रश्न मार्गी लागणार
शहरातील समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी डीपीडिसीतून निधी मंजूर करण्यात आला असून विद्युत लाईन आणि पाईपलाईन हटविण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. तसेच शहरातील मालधक्का पाळधी येथे स्थलांतरित करण्यासाठी देखील पर्याय तपासला जात आहे. भोईटेनगर रेल्वे उड्डाणपुलाप्रश्नी रेल्वे डीआरएमसोबत बैठक झाली असून डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती खा.उन्मेष पाटील यांनी दिली.