दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-१९ साठी अँटीबॉडी शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी ‘कोविड कवच एलिसा’ विकसित आणि प्रमाणित केली आहे.
कोविड-१९ हा साथीचा आजार २१४ देशांमध्ये पसरला असून एकूण ३८,५५,७८८ लोकांना याची लागण झाली असून२.६५,८६२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. गातील बहुतेक देश हा आजार रोखण्यासाठी संघर्ष करत आहेत. जगभरातील देशांकडून विविध प्रकारच्या निदान चाचण्यांची वाढती मागणी आहे. कोरोनासाठीच्या बहुतांश निदान सामग्री इतर देशांतून भारतात आयात केली जाते. म्हणूनच भारतीय वैज्ञानिक कोविड-१९ ला कारणीभूत असलेल्या सार्स-सीओव्ही-२ साठी स्वदेशी निदान पद्धती विकसित करण्याचे अथक प्रयत्न करत आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे ही देशातील सर्वोच्च प्रयोगशाळा असून अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि विषाणू विज्ञानाच्या संशोधनाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. एनआयव्हीच्या सक्षम वैज्ञानिक चमूने प्रयोगशाळेतून पुष्टी झालेल्या रूग्णांमधून सार्स-सीओव्ही-२ विषाणू यशस्वीरित्या वेगळे केले. यामुळे सार्स-सीओव्ही-२ साठी स्वदेशी निदान विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.