जळगाव,;– शहरातील प्रभात चौकात सुरू असलेल्या अंडरपास पुलाचे काम सदोष पद्धतीने असल्याबाबत आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी तक्रार केल्यानंतर शनिवारी दुपारी महापौर भारती सोनवणे यांनी तात्काळ त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. पुलाच्या कामाबाबत असलेली तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत कोणतेही काम करू नये अशा सूचना त्यांनी नहीच्या अधिकार्यांना दिल्या.
बहिणाबाई उद्यान चौकालगत राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासचे काम सुरु आहे. यासाठी लोखंडी सांगाडा उभारला आहे. मात्र या कामासाठी अंडरपासच्या पृष्ठभागाची आणि रस्त्याच्या पृष्ठभागाची लेव्हल योग्य मोजली नसल्याचा दावा आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी केला आहे. शुक्रवारी बर्वे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर शनिवारी लागलीच याबाबत महापौर भारती सोनवणे यांनी कामातील तांत्रिक दोष, अनावश्य होणारा भराव, चौकात विनाकारण करावा लागणारा भराव आदी विषयी पाहणी केली.
महिलादिनाच्या पुर्वसंध्येला महापौर भारती सोनवणे व स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी नागरिकांप्रती जागरुकता दाखवत वेगळ्या पद्धतीने महिलादिन साजरा केला. या दोन्ही पदाधिकारींसोबत नगरसेवक कैलास सोनवणे, मनपाचे अभियंता सुनील भोळे, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, नगरसेवक रियाज बागवान, जमील शेख, आरोग्यदूत अरविंद देशमुख, जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, ललीत शर्मा यांच्यासह इतरांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक सिन्हा यांच्या कार्यालयात धडक देऊन चर्चा केली.
तोपर्यंत काम राहणार बंद
नहीचे प्रकल्प संचालक सिन्हा यांच्या कार्यालयात महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांच्यासह इतरांनी अंडरपास पुलाच्या कामाबाबत तक्रार नोंदविली. सिन्हा यांनी तात्काळ पर्यवेक्षक अभियंता अनुपकुमार श्रीवास्तव व झंडू कन्स्ट्रक्शनच्या अभियंत्यांना बोलविले आणि त्यांच्याकडून सर्व परिस्थिती जाणून घेतली. नहीकडून समाधान न झाल्याने सर्व तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय पुलाच्या सांगाड्यात भराव टाकण्याचे काम करू नये अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. नहीच्या अधिकार्यांनी देखील त्यास प्रतिसाद दिला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा
शहरातील महामार्गाच्या आणि अंडरपास पुलांच्या कामासंदर्भात नगरसेवक कैलास सोनवणे यांनी नहीच्या कार्यालयातूनच भाजपाचे जेष्ठ नेते डॉ.राजेंद्र फडके यांच्याशी संपर्क साधला. सध्या सुरू असलेल्या कामाची सर्व परिस्थिती त्यांना सांगून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्याची विनंती देखील सोनवणे यांनी केली. तसेच खा.उन्मेष पाटील यांच्याशी देखील नगरसेवक कैलास सोनवणे यांनी चर्चा केली व या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
प्रत्यक्षात केली कामाची पाहणी
नहीच्या कार्यालयातून निघाल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि मक्तेदार व नहीचे अधिकारी पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आले. आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी त्यांना त्या परिसरातील सर्व परिस्थिती अवगत करून दिली. त्यानंतर त्यांनी केलेल्या अभ्यास आराखड्याची प्रत त्यांना पाठवून त्यावर निर्णय कळविण्याचे सुचविले.
ते अतिक्रमण हटविणार
शहरातून जाणार्या महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ईच्छादेवी चौकाजवळ असलेले काही शासकीय घरे कामात अडथळा ठरत असल्याची बाब देखील महापौर भारती सोनवणे यांनी नहीच्या अधिकार्यांच्या लक्षात आणून दिली. गेल्याच आठवड्यात याबाबत मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे बैठक झाली असून जळगावाचे मुख्य अभियंता प्रशांत पाटील यांना ती बाब निर्देशनास आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पंधरा दिवसात ते अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली.
मेहरुणकडील नागरिक धडकले
बहिणाबाई चौक लगत अंडरपासविषयी चर्चा सुरु असताना लेंडी नाल्यावरील पुलालगतच्या वसाहतीतील नागरिकही नहीच्या कार्यालयात धडकले. नगरसेवक रियाज बागवान, जमिल शेख आदींनी लेंडी नाल्यावरील पुलाच्या खालील दोन्ही बाजूंनी भुयारी मार्ग (अंडर पास) बनविण्याचा मुद्दा मांडला. तुर्तास तरतूद नसल्याने ते शक्य नसल्याचे नहीचे सिन्हा यांनी सांगितले. परंतु जर मनपाने निधी दिला तर तेथेही अंडरपास करता येईल’, असे सिन्हा म्हणाले. त्यावर महापौर भारती सोनवणे यांनीही मनपा या खर्चाबाबत विचार करेल परंतु तत्पूर्वी नहीकडून ते काम करून घेणे शक्य असल्यास त्यासाठी पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले. दरम्यान, खोटे नगर ते कालिंकामाता मंदिर दरम्यान महामार्गाची संयुक्त पाहणी करावी व नागरिकांची गरज लक्षात घेऊन कामात योग्य ते बदल करावेत अशी सूचना कैलास सोनवणे यांनी केली.