जळगाव;- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनास जळगाव जिल्हावासियांनी सहभागी होऊन
उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हावासियांचे आभार मानले असून या विषाणूंच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जनता कर्फ्यू उद्या (23 मार्च) पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता राज्यातील नागरी भागात कलम 144 लागू केला आहे. या आदेशाची जळगाव जिल्ह्यात पहाटे 5 वाजेपासून अंमलबजावणी करण्यात येणार असून जळगाव शहर महानगरपालिका हद्दीपासून दोन किमी अंतरावरील तसेच जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषदेच्या हद्दीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. हे आदेश जिल्ह्यातील औषधनिर्मिती कारखाने व कृषि उपयोगी औषधे निर्माण कारखान्यांना लागू राहणार नाही. या आदेशाची सर्व संबंधित यंत्रणेमार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेताना नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. एकमेकांशी बोलताना अंतर ठेवून बोलावे. शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरावा. दिवसातून किमान चार ते पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार
शासकीय कार्यालयांमध्ये पाच टक्के कर्मचारी उपस्थितीचे नियोजन संबंधित विभाग प्रमुखांनी करावे. तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कोणतीही दुकाने सुरू राहणार नाही. जे दुकानदार या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कोणी अफवा पसरवतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही पोलिस प्रशासनास दिले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात होणार नाही. यासाठी यापुढेही प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी केले आहे.