पुणे ;– पुणे शहरात 11 कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिक अशास्त्रीय आणि निरूपयोगी मास्क खरेदी करत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी मास्क घालण्याची गरज नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.
कोणता मास्क कोणी वापरावा याचे काही निकष आहेत. नागरिकांनी भीतीपोटी एन-95 मास्क खरेदी केले आहेत. मात्र तो मास्क केवळ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्याच्याऐवजी नागरिकांनी रूमाल वापरणे अधिक उपयुक्त आहे, असं जनरल फिजीशियन डॉ. सुहास नेने यांनी सांगितलं आहे.
निरोगी व्यक्तींनी एन-95 मास्क वापरण्याची गरज नाही. एक मास्क किती काळ वापरावा याचेही शास्त्र आहे. नागरिकांकडून ते पाळले जाण्याची शक्यता नाही. रस्त्यावर होणारी मास्क विक्री हा केवळ बाजारपेठेचा आणि नागरिकांमध्ये पसरलेल्या भीतीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे, असं डॉ. सुहास नेने यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे रूग्ण आढळण्यास सुरूवात झाल्यापासून या संसर्गाचा गैरफायदा घेणारी बाजारपेठ सुरू झाल्याचं चित्र आहे.