पुणे;- रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा केल्याचा संशय असलेल्या ब्रूक फार्माच्या मालकाच्या पोलीस चौकशीवर आक्षेप घेणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिला, असा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

रुपाली चाकणकर आज (१९ एप्रिल) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. त्यामुळे आता गृहमंत्री यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या सामना अग्रलेखातून देखील फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देशभरातील १६ निर्यातदारांकडे २० लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पडून आहेत. पण ही इंजेक्शन्स महाराष्ट्राला विकू नयेत, अन्यथा तुमचे परवाने रद्द करू, अशी धमकी केंद्र सरकारकडून कंपन्यांना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षात असूनही ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर देऊ शकते, हे सिद्ध करण्यासाठीच या कंपन्यांवर दबाव आणला जात आहे. ही सगळी परिस्थिती पाहता भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचे कारस्थान आखले आहे का, अशी शंका येत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.







