जळगाव (प्रतिनिधी)- कारागृहात असतांना आरोपी आणि त्याच्या भावाला सुविधा न पुरविल्याच्या कारणावरून येथील जिल्हा उपकारागृहातील जेल रक्षकाला पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने मारहाण केल्याची घटना 3 रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली असून सदर आरोपीविरूध्द जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेल रक्षक कुलदिपक सुंदर दराडे (वय-26,रा.सबजेल, शासकीय निवासस्थान,जळगाव) हे 3 जुन रोजीच्या सायंकाळी 6 ते 4 जुन रोजीच्या सकाळी 6 अशी रात्रपाळीकरीता त्यांची ड्युटी होती. यावेळी त्यांनी अंमलदार प्रकाश मालचे, शिपाई सचिन कोसके व मेन गेटवर शिपाई अरविंद पाटील असे ड्युटीला हजर होते. त्यावेळी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास पॅरोलवर सुटलेला आरोपी राज वसंत चव्हाण (रा.अमळनेर) हा आला असतांना त्याने जेल रक्षकाला मारून टाकेल अशी धमकी देत, चापटा, बुक्क्यांनी मारहाण करून चॉपरचा धाक दाखविला, मात्र यावेळी आरडाओरड केल्यामुळे क्वॉर्टरमधील कर्मचारी रोशन गिरी, अरविंद मस्के, राहुल बोडके आदी धावुन आल्यामुळे आरोपी राज चव्हाण हा तेथुन पळून गेला. कुलदिपक सुंदर दराडे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून राज चव्हाण याच्या विरूध्द कलम 353,323,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज चव्हाण या आरोपीविरूध्द अमळनेर पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे कळते.तसेच आरोपी आणि त्याचा भाऊ या दोघांना लातुर कारागृहातुन पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळात आरोपी राज चव्हाणच्या भावाने अमळनेर येथे दहशत माजवल्यानंतर जमावाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे कळते. आरेापीची पार्श्वभुमीवर गंभीर गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे जेल रक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपी राज चव्हाण हा जळगाव कारागृहात असतांना त्याला व त्याच्या भावाला जेल रक्षकाने सुविधा न दिल्याचा राग आल्याने त्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे.